Tuesday, 8 July 2014

ओळख: चा(बा)हुलीची

     
     गावाला जाणं मला खुप आवडायचं
, आधी फक्त उन्हाळ्यातच आम्ही जायचो पण आता अचानकपणे गावला जायचं हे तर आमच्या घरच्यांच्या पाचवीला पुजलेले आहे कि काय असं वाटायला लागलाय. असो. कदाचित नातेसंबंधच एवढे मोठे झालेत, सौरी बनवलेत कि लग्न, साखरपुडा, बारसे, पुजा आणि वास्तुशांती हे असे आनंदमयी कार्यक्रमांसोबत कोणाची माती, दहावा, तेरावा, कार्य आणि श्राध्द यांपैकी एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचा योग तीन महिन्यातून एकदा येतोच आमच्या वाट्याला...:) असो.
     आमच्या (म्हणजे माझी इच्छा नसतानाही) मुक्कामाचे शक्यतो  ठिकाण म्हणजे अनावडी (माझ्या मामाचे गाव) असायचे. तिथले लोक काही वाईट नाहीत पण तिरस्कार करण्यायोग्य थोडेफार आहेतच. मोठे आणि एकत्र कुटुंब आहे, साधारणपणे २० माणसाचं, चार भावाचं ते बंधुप्रेम आहे. आमचे मामा म्हणजे आमच्या सगळ्या भाच्यांना जणू कंसमामा वाटायचे. थोडेफार या गोष्टीत तथ्य आहे. मोठे मामा ते खूप लेक्चर द्यायचे, म्हणजे चांगले सांगायचे पण खूप प्रमाणात अतिरेक आणि अतिशयोक्ती पण करायचे मग त्यामुळे आम्हाला खूप तिरस्कार वाटायचा त्यांचा, आता नाही वाटत ती गोष्ट वेगळी आहे, असा म्हणण्यापेक्षा सवय झालीये पण त्यांनापण जाणीव झालीये मुले खूप मोठी झालीयेत आता, त्यांना कितपत बोलले पाहिजे, कसे वागले पाहिजे.
      आमच्या मामांचे घर म्हणजे पाटील घराणे, आडनाव शिंदे असले तरी मानाने पाटीलच गावाचे ते. साधारणपणे २० एकर जमीन(बागायत), तीन दुकाने, स्वतःची डेअरी, अर्ध्या एकरात अलिशान घर, तीस गुरे, गाड्या इत्यादी सर्व त्यांची आयुष्यभराची मेहनत. महादेवमामा(मोठे मामा) माथाडीमधून रिटायर्ड झालेले त्यानंतर सदाशिवमामा(दुसरे मामा) तेही बेस्ट मधून निवृत्त झालेले, त्यानंतर भगवानमामा(तिसरे मामा) हि व्यक्ती म्हणजे घराचा कणा, आधारस्तंभ. अगदी जहाल आणि थोड्या मवाळ स्वभावाचे नेतृत्व असलेल्या या मामानी वयाच्या एकविसाव्या वर्षी गावाच्या विकास सेवा सोसायटीचे चेअरमन हे पद पटकावले आणि तेही एकवीस वर्षे टिकवले, कदाचित अजूनही त्यांनी या पदावर अजून कित्येक वर्षे काढली असती पण अन्हुतपणे अख्ख्या गावावर आणि घरावर संकट कोसळले आणि हे मामा देवाला आवडते झाले..:( घर अगदी पोरके झाले पण देवापुढे कोणाचे काय चालेल. या मामांच्या पश्चात आता आबामामा(चौथे मामा) हे घराची धुरा सांभाळतात. घर आणि शेतीपुरातच संबंध असलेल्या घरच्यांना भगवान मामांच्या जाण्याने खूप त्रास सहन करावा लाहाला. हळूहळू आता मामांच्या मुलांनी आणि मामांनी मिळून आता घर सावरलेले आहे.
      पण शांततेचा मात्र आता भंग झालाय. कोणाचा कोणाला ताळमेळ नाहीये, अगदी धरून बांधून एकत्र राहिल्यासारखे हे लोक राहताहेत. खर तर सगळ्याच्याच मनात वेगळे रहायची भावना आहे पण मानहानी होऊ नये याकरिता हे एकत्र राहत आहेत. वाद एवढे वाढलेत कि आता मुलींची लग्न झाल्यांनतर वेगळे राहायचे असे ठरविले आहे.
      महादेव मामांची मनीषा, शीतल आणि वैभव, सदाशिव मामांचे प्रशांत आणि महेश, भगवान मामांचे शुभांगी, सोनाली आणि सत्यवान, आबा मामांचे प्रणाली, कल्पेश आणि अभिमन्यू. हे सर्व आमच्य मामांची मुले-मुली.
      या आमच्या मामांच्या घरात दोघांची लग्न एकत्र करायची अशी प्रथा या पिढीसाठी पडली आहे.म्हणजे भाव-बहिणीचे, बहिणी-बहिणीचे एकाच मांडवात लग्न. यामध्ये पहिले मनीषा आणि शुभांगी  यांचे लग्न झाले. त्यानंतर प्रशांत आणि शीतल यांचे जाहले.आता महेश आणि सोनाली यांच्यासाठी स्थळे पाहायचे चालू आहे. त्यानंतर वैभव आणि प्रणाली, म्हणजे सर्वसाधारणपणे येत्या २ वर्षात हि लग्न होतील. मुलींच्या लग्नाचा शेवट प्रणाली करणार.
      या सगळ्या पोरांशी माझी लहानपणापासूनच ओळख होती पण येणे
-जाणे खूप कमी असायचे. आम्ही भाऊ-बहिणच मुळात जायचो नाही तिथे, कारण आमच्यात थोडे गुण मुंबईचे होते त्यांना ते वेगळे वाटायचे आणि सगळे आम्हाला नावं ठेवायचे मग आमचा त्यांच्याबद्दलचा राग अजूनच वाढायचा. हळूहळू यामधल अंतर सगळ संपून गेलं. मोठे झाल्यावर प्रेमापोटी, नावं न ठेवून घेण्यापोती आणि गाठी-भेटी या हेतूने नात अजून जवळ होऊ लागल. सगळ्यांना आवडू लागलं आणि आमच्या मनातला तिरस्कार जवळ-जवळ गायब झाला.
      मामाच्या इथे खेळायला मुलांना आजिबात वाव नसतो, कामच इतके कि बोलू नका. फक्त जेवायला, शाळा-कॉलेजात जायला, आणि रात्रीच्या कॉमन वेळी झोपायला आणि इअतर वेळेत फक्त आणि फक्त कामे करायची. मग आम्हीही जायचो त्यांच्यासोबत कधी कधी कामे करायला, कधी कधी भांडायचो पण लगेच जागेवर यायचो, टोमणे वगैरे चालायचे पण तेवढ गोड मानून घ्यायचो. मामांच्या मुली म्हणजे लाजाळूची झाडेच जणूकाही, दाजी आलेत असं समजल कि लगेच गायब व्हायच्या , फक्त कसे आहात?, कस चाललाय? एवढाच आमच बोलन व्हायचं. अख्ख्या घरात प्रणाली फक्त सारखी रागात असायची, चिडायची. तिचा चेहरा पाहून लगेच कळायचं हिला आपला खूप राग येतोय आणि हे खरच होते. कदाचित तिचं म्हणन म्हणजे कशाला आलाय हा बावळट, फुकट शायनिंग करतोय, मुंबईला राहतो म्हणून काय हिरो लागून गेला कि काय मोठा. तरीही आपण मात्र थोडासा संयम आणि चांगुलपणा म्हणून तिला विचारायचे कशी काय आहेस? तिने मग खोटे हसायचे आणि फक्त 'बरी' असं म्हणायचं आणि निघून जायचं, ते मी घरातून पुन्हा जात नाही तोपर्यंत समोर यायचं नाही. तशी ती वाईट नाही पण समोरच्याची मनस्थिती ओळखायला, भावना, प्रतिक्रिया जाणून घ्यायला कमी पडायची आणि त्यामुळेच सारखी चिडत रहायची. तिच्यातही आता थोडा थोडा बदल होत गेला. व्यवस्थित पाहुणचार, घरातील जबाबदारी सगळ काही छान झाल. पण आता तीच ते नेहमीच लाजण आणि हसण आता अगदी जिव्हारी लागायला लागलं. तिच्याबद्लानंतर त्यावेळी तिची थोडीशी चाहूल लागली कि सगळं काही बेभान व्हायचं पण सगळ काही मनातच ठेवायचं, राहायचं आणि चेहरा निर्विकार होवून टाटा बाय बाय व्हायचं.....:)

                                                                                                 
                                                                                                    ----आबासाहेब. . . . .

                                                                                               ( कुमार विश्वासराव मांढरे)